जिल्ह्यात 10 नगर परिषद व 1 नगरपंचायीतींच्या होणार निवडणूक

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur municipal elections 2025 राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मंगळवारी जाहीर झाल्या असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 1 नगर पंचायतीचा समावेश आहे. जिल्ह्यातील ‘ब’ वर्गात येणार्‍या बल्लारपूर, भद्रावती, वरोडा, तर ‘क’ वर्गातील ब्रम्हपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मुल आणि नागभीड या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका तसेच भिसी नगर पंचायतीची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे. 3 डिसेंबरला निकालही येईल. त्यामुळे निवडणुकीची तयारीला लगेच सुरूवात झाली आहे.
 

chandrapur municipal elections 2025 
सिंदेवाही (लो), सावली, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना आणि जीवती या 6 नगरपंचायतींच्या निवडणुका 2022 लाच पार पडल्या असल्याने तेथे आता निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी पार पडेल. 4 नोव्हेंबरपासून राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे.
 
 
राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानिक संस्थांचा कार्यकाळ संपलेला असल्याने या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. सध्या राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाने 32 जनजागृती मोहिमा आखल्या आहेत. महिलांसाठी ‘गुलाबी मतदान केंद्रे’ उभारण्यात येणार असून, तेथे सर्व अधिकारी महिला असतील. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना प्राधान्याने मतदानाची संधी मिळणार आहे. विभागनिहाय मतदानात कोकण विभागात 17, नाशिक विभागात 49, पुणे विभागात 60, संभाजीनगर विभागात 52, अमरावती विभागात 45 आणि नागपूर विभागात 55 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी मतदान होईल.


2 ला निवडणूक आणि 3 ला निकाल
नामनिर्देशन प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, चिन्हवाटप 26 नोव्हेंबरला होईल. प्रशासनानेही आता निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी तयारीला सुरूवात केली आहे.