तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Kisan Wankhed : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आला आहे. समस्या निराकरण समाधान परिवाराच्या पुढाकारातून झालेल्या चर्चेत मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी सकारात्मक निकाल लागला. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दर्शनी भाग खुला होणार आहे.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेत उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार किसन वानखेडे, भारत पेट्रोलियम कंपनीचे अकोला येथील विभागीय समन्वयक विजय सिद्धी, तांत्रिक अभियंता गौरव बढे, सारडा पेट्रोलपंपाचे संचालक दिलीप सारडा तसेच समस्या निराकरण समाधान परिवाराचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत सारडा पेट्रोलपंपाच्या पश्चिमेकडील जागेत असलेली टिनपत्र्याची कॅबिन व स्वच्छतागृह तत्काळ हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पूर्वेकडील भागात आवश्यक ती सोय करण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दर्शनी भाग खुला होणार आहे. शिवभक्तांना पुतळ्याचे सौंदर्य स्पष्टपणे पाहता येईल. हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांच्या भावना जपल्या गेल्या आहेत, असे समाधान आमदार किसन वानखेडे यांनी व्यक्त केले.