तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
chopan-kakad-aarti : चोपण येथे काकडआरतीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या सुमारास भूपाळी म्हणत गावात फिरून संपूर्ण गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होत असल्याने संपूर्ण गावाला प्रफुल्लीत वाटत आहे.
 
 
‘उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख’ म्हणत या काकडआरतीला सुरुवात होते. गावामध्ये एक सार्वजनिक तर एक घरगुती काकडआरती आहे. सार्वजनिक काकड आरतीला गावातील गंगाराम महाराज मंदिरातून सुरुवात होते. काकड आरतीमधील भाविक पहाटे 4.45 वाजता गंगाराम महाराज मंदिरामध्ये येतात. तिथून गावामध्ये भूपाळी म्हणत टाळ-ढोलकीच्या गजरात गावामध्ये फिरतात. त्यामुळे गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. अश्विन पौर्णिमेपासून या काकड आरतीला सुरुवात होऊन ती कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते.
 
 
 चोपण येथील काकड आरतीला 150 वर्षांची परंपरा लाभली असून आजतागायत गावकरी ती जोपासत आहेत. या काकडआरतीमध्ये गावातील आबालवृद्ध पहाटेच्या सुमारास येऊन देवाची आराधना करतात. कार्तिक पौर्णिमेला काकडा नदीच्या वाहत्या प्रवाहात विसर्जित करून काकडआरतीची समाप्ती होते.