कापूस वेचणीसाठी किलोला २० रुपये!

मजुरांचे भाव वधारले

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे),
Cotton harvesting शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी मुद्दांवर नागपुरात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. त्यातच मंगळवार रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे कापूस घरी आणण्यासाठी मजूर मिळत नाही. या भागात एक मण कापूस वेचण्याकरिता शेतकरी ४०० रुपये देत आहेत. या अनाकलनीय मागणीकडे शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे.
 
 

Cotton harvesting  
मोंथा चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण जिल्ह्याला बसला आहे. हवामान विभागाने पावसाचे संकेत दिले होते ते तंतोतंत खरे ठरले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार सुरूवात केल्यामुळे शेतातील कपाशीचे पीक धोयात आले आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीनच्या उत्पन्नात घट आली. आता पाऊस कापूस उत्पादकांच्या मुळावर उठला आहे. यंदा शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. शेतकर्‍यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाकरिता भरपूर खर्च केला. मात्र, सोयाबीननंतर कापूस उत्पादकांना दररोजच्या पावसाने नाउमेद केले. सलग पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कपाशीला पाहिजे त्या प्रमाणात बोंड धरलीच नाही. आहे ती बोंड काळपट आणि सडून खाली पडताना बघून शेतकर्‍यांना होणार्‍या वेदना कल्पनेपलिकडच्या आहेत. शेतकर्‍यांना कापसाचा पहिला वेचा घरी आणणे सुद्धा जमले नाही. गतवर्षी १० रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणारी महिला यंदा २० किलो कापूस (एक मण) चक ४०० रुपये मागत आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी कापूस वेचणीला अद्याप सुरूवात केली नाही. या दरवाढीचे शेतकर्‍यांना टेंशन आहे, ते वेगळेच! शेतकरी दिवसागणिक आर्थिक खाईत जात आहे.
 
 
 
सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्यानंतर आता हरभऱा पिकावर शेतकर्‍यांची भिस्त होती. सोयाबीनच्या रिकाम्या झालेल्या जमिनीवर मशागत करून शेतकर्‍यांनी चणा पेरणी केली. परंतु, हरभर्‍याच्या पेरणीवर अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बियाणे अंकुरणार की नाही? अशी चिंता आहे. आता हरभरा पीक पेरायचे की नाही अशी चिंता असल्याचे शेतकरी अरविंद बोरकर यांनी सांगितले.