तभा वृत्तसेवा
दारव्हा,
darwha tulsi vivah celebration दारव्ह्यातील नवीन वसाहतीतील श्री शिर्डी साई मंदिरात सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता सामूहिक तुळशी विवाह उत्साहात साजरा झाला.
दैनिक तरुण भारतचा शताब्दी महोत्सव आणि श्री नरकेसरी प्रकाशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांपैकी सामूहिक तुळशी विवाह हा एक उपक्रम होता. 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत. येथील नवीन वसाहतीमधील श्री शिर्डी साई मंदिरात सोमवारी तुळशी विवाह साजरा झाला. तुळशी विवाहाकरिता बावणे व मोहन सरागे यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून सजावट, रांगोळ्या, बिछायत, संगीतमय मंगलाष्टकांची व्यवस्था केली. तर भजनी मंडळींनी या कार्यात विशेष रंग भरला.
दैनिक तरुण भारतच्या या उपक्रमाची माहिती, तुळशीचे महात्म्य व आरोग्यविषयक माहिती निवृत्त उपशिक्षणाधिकारी सीमा पापळकर यांनी दिली. याप्रसंगी श्री शिर्डी साई मंदिराचे विश्वस्त गणेश दुधे, प्रमोद डांगे, सुरेश दुधे, नवनीत शहाकार व हरीभाऊ काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन सरागे यांनी केले. तर आभारप्रदर्शन सतीश पापळकर यांनी केले.याप्रसंगी साईनाथ भजनी मंडळ, आशा दुधे, मंगला राऊत, प्रीती शहाकार, जयश्री राठोड, मालती दुधे, जयश्री बलखंडे, रेणूका बावणे, आशा पवार यांनी स्तुत्य उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.
108 तुळशीचे सामूहिक विवाह सोहळा, विठ्ठल मंदिर संस्थानचा उपक्रम
आर्णी,
तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त काही महिन्यांपूर्वी तुळशीरोपण कार्यक्रम घेतला होता. त्यात आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थाननेही भाग घेतला होता. त्यानंतर आता सामूहिकरित्या तुळशीविवाहचे महात्म्य व त्याची उपयुक्तता दर्शविणे व जनमानसात आपली संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने तरुण भारतने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त सामूहिक तुळशी विवाहाचे आवाहन केले.
त्यासाठी लागणारे साहित्य व माहितीचे साहित्य देण्याचे सांगत सामूहिक तुळशी विवाहाचे आवाहन केले. यात विठ्ठल मंदिर संस्थानने याला सहमती दर्शवित 3 नोव्हेंबरला 108 परिवारांनी यात सहभाग नोंदवून उत्साहात सामूहिक विवाह सोहळा उत्साहात झाला. आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थानकडून रात्री द्वादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिर परिसरातील व शहरातील 108 परिवारातर्फे तुळशीचे सामूहिक विवाह सोहळा भक्तीभावाने व परंपरेनुसार शालीग्राम कृष्णदेवाची वरात काढून मंगलाष्टकांच्या निनादात सामूहिक विवाह सोहळा झाला.
आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. रमेश चिंतावार सचिव विनायक थोडगे व विश्वस्तांच्या संकल्पनेतून कार्तिक महिन्याच्या द्वादशीला विठ्ठल मंदिर संस्थानकडून माता तुळशीचे सामूहिक विवाह सोहळा साजरा करण्याचा निश्चय केल्यावर तयारीला सुरवात झाली. आर्णीच्या विठ्ठलमंदिर परिसर व शहरातील परिवारांनी होकार दर्शवल्यानंतर सोमवार, 3 नोव्हेंबला विठ्ठल मंदिर संस्थानच्या सुनंदादेवी राजाभाऊ पद्मावार सभागृहात व मंदिरात संध्याकाळी 5 वाजेपासून विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला असून यात 108 परिवारांचा सहभाग होता.
दरवर्षी, देवउठणी एकादशीच्या नंतरच्या दिवशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाहाचा पवित्र विधी साजरा केला जातो. हा शुभप्रसंग देवी तुळशी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेल्या भगवान शालीग्राम यांच्या औपचारिक विवाहाचे प्रतीक आहे. संध्याकाळी 7 वाजता गणपती मंदिर येथून बँडबाजाच्या तालावर सजवलेल्या कृष्णाच्या मूर्तीचे ताट हातात घेऊन शेकडो महिला पुरुषांसह वरात काढण्यात आली. विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर वरातीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सर्व पाहुण्यांनी घरुन आणलेले तुळशी वृंदावन व कृष्णदेवाला पाटावर ठेऊन मंत्रोच्चारात स्थापना करण्यात आली. नंतर मंगलाष्टकांच्या स्वरात श्रीकृष्ण-तुळशी मातेचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्यानंतर आरती झाली. सर्व परिवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत प्रसादाचे वितरण व आतीषबाजी करण्यात आली. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पौरोहित्य आनंद थोडगे यांनी केले.
यावेळी अल्पोपहाराची ही व्यवस्था करण्यात आली होती. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. चिंतावार, मनोहर केशववार, विनायक थोडगे, रवींद्र पिट्टलवार, अनिल पोदुतवार, अशोक भेंडे, अनिता चिंतावार, समृद्धी कथळे, राजेश माहेश्वरी, विठ्ठल मंदिर परिसरातिल भक्तगण, विठ्ठल मदिर भजनी मंडळ, काकडा आरती समितीचे महिला पुरुष सदस्यांनी अथक परिशम घेवून विवाह सोहळा संपन्न करण्यात प्रयत्न केले.