न्यायालयाच्या तळघरात सिलेंडरचा स्फोट, चार ठार

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Explosion in courthouse basement इस्लामाबादच्या सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. न्यायालयाच्या तळघरात असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राजधानीतील या घटनेमुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
 

Explosion in courthouse basement 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत सेंट्रल एसी प्रणालीची देखभाल सुरू असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे न्यायालयाची इमारत काही क्षणासाठी हादरली. मोठ्या आवाजासह उठलेल्या धुराच्या ढगांमुळे काही काळ परिसरात काहीच दिसत नव्हते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की तो न्यायालयाच्या इमारतीबाहेरही ऐकू आला. वकील, न्यायाधीश आणि कर्मचारी घाबरून बाहेर पळाले. काही काळ न्यायालय परिसरात अफरातफर पसरली होती.
 
स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथके आणि सुरक्षा दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.