नवी दिल्ली,
Indian Sikhs enter Pakistan ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर पहिल्यांदाच शीख यात्रेकरूंचा मोठा जथ्था पाकिस्तानात पोहोचला असून, अटारी-वाघा सीमेवर त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करण्यात आला. गुरु नानक देव जी यांच्या ५५६व्या जयंतीनिमित्त या यात्रेकरूंच्या भेटीला विशेष महत्त्व लाभले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानात गेलेला हा पहिलाच शीख यात्रेकरूंचा गट आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सीमेवर यात्रेकरूंना पारंपरिक स्वागत केले. यावेळी वातावरण भक्तीमय झाले होते. नानकाना साहिब, पंजा साहिब, डेरा साहिब आणि करतारपूर साहिब या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी हे यात्रेकरू गेले असून, १३ नोव्हेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.
श्री अकाल तख्त साहिबचे कार्यवाहक जथेदार ज्ञानी कुलदीप सिंग गडगज हे या यात्रेकरूंच्या जथ्यासोबत आहेत. त्यांनी सीमेवर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला केंद्र सरकारकडून पाकिस्तान यात्रेस मंजुरी मिळत नव्हती; परंतु वाहेगुरूच्या कृपेने आणि समुदायाच्या प्रार्थनांमुळे अखेरीस पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या यात्रेला परवानगी दिली. या निर्णयाचे सर्व शीख समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे.
जथेदार गडगज यांनी पुढे सांगितले की, ते पाकिस्तानातील गुरुद्वारा नानकाना साहिब येथे विशेष प्रार्थना करणार आहेत, जेणेकरून बंद असलेला करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू होईल. यात्रेच्या समाप्तीनंतर हा कॉरिडॉर खुला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये ही तीर्थयात्रा स्थगित केली होती; परंतु परिस्थिती सुधारल्यानंतर परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाने सल्लामसलत करून अखेर मंजुरी दिली. पाकिस्तान सरकारने देखील या यात्रेस सहकार्य दर्शवित १८०० अर्जांपैकी १७९४ शीख यात्रेकरूंना व्हिसा प्रदान केला आहे. या यात्रेच्या निमित्ताने दोन देशांतील तणावग्रस्त संबंधांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, अशी श्रद्धाळूंची आशा आहे.