बुलढाणा,
Life blooms in Lonar Lake बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर अंतराळातील उल्कापातातून निर्माण झालेले जगातील अद्वितीय सरोवर आता नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. हजारो वर्षांपासून खाऱ्या आणि अतिक्षारयुक्त पाण्यामुळे जेथे एका किटकाचाही वावर शक्य नव्हता, तिथे आज जिवंत माशांची हालचाल पाहून वैज्ञानिक आणि पर्यावरणप्रेमी दोघेही अवाक झाले आहेत. हा ऐतिहासिक आणि आश्चर्यचकित करणारा प्रकार पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे. पावसाचे पाणी आणि शहरातील सांडपाणी सरोवरात मिसळल्यामुळे पाण्याचा रासायनिक समतोल पूर्णपणे ढासळला आहे. परिणामी, पाण्यातील क्षाराचे प्रमाण झपाट्याने घटले असून, त्यामुळे माशांसह इतर सूक्ष्मजीवांना वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते पाण्याचा पीएच स्तर ७ ते ८ दरम्यान असल्याचे आढळले आहे. यापूर्वी तो १० पेक्षा अधिक होता म्हणजे अत्यंत क्षारयुक्त, जिथे कोणत्याही जीवाचा टिकाव लागत नव्हता. आता या बदलामुळे सरोवरात जिवंत माशांचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, लोणार सरोवर हे जगातील तिसते आणि भारतातील एकमेव अशा प्रकारचे सरोवर आहे, जे उल्कापातामुळे निर्माण झाले आहे. पण या सरोवरात जैविक बदल होणे ही निसर्गासाठी चिंतेची घंटा आहे. पाण्यात जीवसृष्टी निर्माण होणे आश्चर्यकारक वाटत असल तरी, यामुळे सरोवराच्या प्राचीन संरचनेवर आणि रासायनिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. स्थानिक नागरिक आणि संशोधकांनी प्रशासनाला याबाबत तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. हे केवळ नैसर्गिक बदल नाही, तर मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास लोणार सरोवराचे खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.