महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा?

दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Maharashtra election dates राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आजच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. आयोगाने या संदर्भात सर्व तयारी पूर्ण केली असून, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकार परिषद संपताच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
 
 

Maharashtra election dates 
या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडतील, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असून, या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
नगरपालिका निवडणुकीची घोषणा मंगळवारी म्हणजेच आजच होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने राज्यात आचारसंहिता लागू होण्याची चिन्हं तीव्र झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक निश्चित करण्याची हालचाल वेगाने सुरु केली आहे. या आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिकांचा समावेश असणार असून, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.