मुंबई,
maharashtra rain alert राज्यातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेल्याने रब्बी हंगामावर संकट ओढावले आहे. हवामान विभागाने नव्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून, त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 यावर्षी पावसाने राज्याला चांगलाच दम दिला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा कालावधी उशिरा झाल्याने आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत नुकसान झाले. त्यातच बंगालच्या उपसागरातील "मोंथा" चक्रीवादळाचा परिणाम आणि आता पुन्हा सुरू झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही हैराण झाले आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, राज्यात पुढील २४ तासांत तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु, त्यानंतर हवेत उष्णतेत वाढ जाणवेल. किमान तापमान दोन दिवस स्थिर राहील, मात्र त्यानंतर दोन ते तीन अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भात तापमानात दोन ते चार अंशांची घसरण दिसून येईल.
 
 
आज कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरला रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
 
७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचे संकेत आहेत. एकूणच, राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले असून, शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.