पेनसिल्व्हेनिया,
prison without committing a crime अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सुब्रमण्यम वेदाम नावाच्या ६४ वर्षीय भारतीय वंशाच्या नागरिकाने गुन्हा न करता तब्बल ४३ वर्षे तुरुंगात घालवली. अखेर न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले, पण आता त्याच्याच जीवनावर नव्या संकटाचे सावट आले आहे अमेरिकेतून हद्दपारीचे.
 
 
 
सुब्रमण्यम वेदाम यांचा जन्म भारतात झाला, परंतु वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत ते आपल्या पालकांसह अमेरिकेत स्थायिक झाले. पेनसिल्व्हेनिया राज्यातील स्टेट कॉलेज येथे त्यांनी बालपण घालवले. त्यांचे वडील पेन्स्टेट विद्यापीठात प्राध्यापक होते. अमेरिकन संस्कृतीत वाढलेला हा तरुण १९८२ साली एका खुनाच्या आरोपात अडकला आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याच्यावर त्याचा मित्र थॉमस किन्सर यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. ठोस पुरावे, साक्षीदार किंवा कोणतीही वैज्ञानिक चाचणी नसतानाही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. दोनदा खटला चालला आणि दोन्ही वेळा त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुरू झाली आयुष्यभर चालणारी कारागृहातील शिक्षा.
 
या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रकरणात नाट्यमय वळण आले. अनेक दशकांनंतर सापडलेल्या नव्या बॅलिस्टिक पुराव्यांनी वेदाम यांची निर्दोषता सिद्ध केली. अभियोक्त्यांनी हे पुरावे जाणूनबुजून लपवून ठेवले होते, हेही समोर आले. न्यायालयाने तत्काळ त्यांची शिक्षा रद्द करत सुटका करण्याचे आदेश दिले. परंतु, सुटकेच्या दिवशीच अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. त्यांचे नागरिकत्व पूर्ण झाले नसल्याचे कारण देत आता त्यांची हद्दपारी करण्याची तयारी सुरू आहे. वेदाम यांचे वकील या निर्णयाविरोधात कोर्टात गेले असून, सध्या त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. तरीही त्यांचे भविष्य अजूनही अनिश्चित आहे.
 
सुब्रमण्यम सध्या लुईझियानातील अलेक्झांड्रिया येथील डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत, हेच ठिकाण बहुतेक स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी अंतिम टप्पा मानले जाते. त्यांचे वकील आणि मानवी हक्क संघटना या प्रकरणाला “न्यायाचा गंभीर अपमान” म्हणत आहेत. चार दशकांपेक्षा अधिक काळ तुरुंगात काढून निर्दोष सिद्ध झालेल्या या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कहाणी आता अमेरिकन न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभी करत आहे. “४३ वर्षांचा कैद आणि आता हद्दपारी?” असा सवाल जनतेतूनही उपस्थित केला जात आहे.