गडचिरोली,
Nagaraadhyaksha election गडचिरोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना अक्षरशः वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांची गणिते कोलमडली आहेत. कारण यावेळी पुन्हा एकदा महिला ओपन अशी सोडत निघाल्याने अनेक पक्षांना योग्य उमेदवार शोधण्यात अडचण निर्माण झाली आहे.
काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम महिला उमेदवार नसल्याने पक्षाने सुरुवातीला स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्येच शोधाशोध केली. मात्र योग्य उमेदवार न मिळाल्याने काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार यांना पक्षात प्रवेश देत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसच्या या रणनीतीनंतर भाजपनेही तातडीने आपली चाल खेळत सागर अरुण निंबोरकर या युवा कार्यकर्त्याला पक्षात वाइल्ड कार्ड एन्ट्री दिली. या प्रवेशाने गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सागर निंबोरकर Nagaraadhyaksha election आणि त्यांच्या पत्नी प्रणोती निंबोरकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रणोती सागर निंबोरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे.जर प्रणोती निंबोरकर भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या, तर निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना थेट टक्कर देणार्या प्रणोती निंबोरकर या शिक्षित, नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या महिला असून, शहरात निंबोरकर घराण्याचा विशेष प्रभाव असल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते.
गडचिरोली शहरात निंबोरकर घराण्याचे वेगळे स्थान आहे. थेट राजकारणात नसतानाही हे कुटुंब समाजकार्यात सक्रिय राहिले आहे. विविध सामाजिक उपक्रम, उत्सव आणि लोककल्याणासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला आहे. सागर निंबोरकर यांनी गणपती आणि दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून तरुणांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या समाजातील लोकप्रियतेचा विचार करून त्यांना पक्षात वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे संधी दिली आहे.
या एन्ट्रीमुळे भाजपला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा असून, काँग्रेससाठी ही नवीन डोकेदुखी ठरू शकते. विशेष म्हणजे, सागर निंबोरकर यांचा प्रवेश हा गडचिरोलीच्या राजकारणात अनपेक्षित पण प्रभावी असा ठरला आहे. शहरातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसने माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद निवडणुकीची रणनिती आखली असून, त्यांच्या मर्जीतील कविता पोरेड्डीवार या उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. दुसरीकडे, भाजपकडून प्रणोती निंबोरकर यांचे नाव पुढे येत असल्याने निवडणूक सरळसोट न राहता अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.काँग्रेसने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. मात्र सध्या भाजपमध्ये उमेदवार निश्चितीचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असून, अधिकृत घोषणा होताच शहरातील निवडणूक वातावरण तापण्यास वेळ लागणार नाही, एवढं मात्र निश्चित.