इस्लामाबाद,
pakistan-constitution पाकिस्तानमध्ये सत्तेचा नवा समीकरणीय खेळ सुरू झाला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फिल्ड मार्शल’ पदावर पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे ते पाकिस्तानातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत. शहबाज शरीफ सरकार आता त्यांना आणखी अधिकार देण्यासाठी संविधानात दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे.

ही माहिती स्वतः पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नव्हे, तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत खुलासा केला की, शहबाज शरीफ यांनी 27 व्या संविधान दुरुस्तीवर पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या पक्षाशी संपर्क साधला आहे. पूर्व खासदार मुस्तफा नवाझ खोखर यांनीही यावर भाष्य करत म्हटलं आहे की, या प्रस्तावित 27 व्या दुरुस्तीचा मुख्य उद्देश संविधानातील कलम 243 मध्ये बदल करण्याचा आहे. हे कलम लष्करी दलांचे नियंत्रण, कमांड आणि सेवा प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात आहे. “बाकी सगळं फक्त धूर आणि गोंधळ आहे,” अस खोखर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. पाकिस्तान सरकारच्या मते, या दुरुस्तीत न्यायालयीन अधिकार आणि न्यायाधीशांच्या बदलीबाबतच्या तरतुदींसोबत कलम 243 मध्ये सुधारणा केली जाणार आहे. या बदलामुळे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची सत्ता आणि अधिकार आणखी वाढतील.
सध्या पाकिस्तानच्या संविधानात ‘फिल्ड मार्शल’ या पदाला कायदेशीर मान्यता नाही. pakistan-constitution मात्र, असीम मुनीर यांना हे पद देण्यात आल्याने पहिल्यांदाच 1973 च्या संविधानानंतर असा प्रसंग निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे कायदा राज्यमंत्री अकील मलिक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि या पदासाठी संवैधानिक चौकट तयार करण्याची आवश्यकता आहे.” असीम मुनीर 28 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे संविधानात बदल झाल्यास त्यांच्या कार्यकाळातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदर पाहता, पाकिस्तानमध्ये जनरल मुनीर यांच्या वाढत्या प्रभावामुळे लष्कर आणि राजकारणातील सीमारेषा आणखी धूसर होताना दिसत आहेत.