नवी दिल्ली,
The cold will intensify देशभरात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपासून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार आहे, ज्याचा परिणाम थेट हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या पर्वतीय राज्यांवर दिसून येईल. या विक्षोभामुळे या राज्यांत पाऊस, बर्फवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि पूर्व भागात तसेच म्यानमारच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या हवामान बदलामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि मध्य भारतात ४ नोव्हेंबरनंतर तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअस इतकी घसरण होऊ शकते, असे हवामान विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत थंडीची लाट अधिक तीव्र होणार आहे.
  
अंदमान-निकोबार बेटांवर या काळात विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागात ४ नोव्हेंबरपासून जोरदार वारे आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थान, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ४ व ५ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रवासी व शेतकऱ्यांना हवामान सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
दक्षिण भारतातही हवामानात बदल जाणवणार असून ६ नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि किनारी कर्नाटक या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याचा निष्कर्ष स्पष्ट आहे  हिवाळ्याची चाहूल लागली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तापमान कमी होईल आणि थंडीची लाट तीव्र होणार आहे. नागरिकांनी प्रवास आणि दैनंदिन कामांदरम्यान हवामान बदलाची दखल घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.