वर्धा,
Dhangar community, बंजारा, धनगर, वंजारी व इतर जातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीच्या विरोधात संयुत आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज मंगळवार ४ रोजी स्थानिक जुना आरटीओ मैदानातून महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सिव्हील लाईन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आल्यावर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत मोर्चाने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक गाठला. या ठिकाणी मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. यावेळी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. मोर्चाच्या माध्यमातून धनगर, बंजारा, वंजारी व इतर कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश कऱण्यात येऊ नये. आदिवासींच्या जमिनी भाड्याने देण्याबाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. आदिवासींच्या कल्याणाकरिता असलेल्या योजनांची रक्कम इतर योजनांकडे वळती करण्यात येऊ नये. छोट्या बिंदू नामावलीबाबत ६ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करून पुर्वरत बिंदू नामावली मध्ये सुधारणा करून ते कायम ठेवण्यासाठी सुधारित शासन निर्णय काढण्यात यावा. वर्धा शहराच्या आदिवासी सांस्कृतिक भवनाकरिता जागा उपलब्ध करून आदिवासी समाज भवन बांधण्यात यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास ३ हजाराच्या वर महिला व पुरुषांची उपस्थिती होती.