नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनाविरुद्ध अभाविपचा हल्लाबोल

उद्या कॉलेज बंद आंदोलन

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
वर्धा,
nagpur-university-administration राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या शैक्षणिक अपयशाच्या आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यात आलेल्या असमर्थतेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उद्या गुरुवार ६ रोजी जिल्ह्यात कॉलेज बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
 
 
nagpur-university-administration
 
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या कामकाजातील निष्काळजीपणा, निष्क्रियता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात अभाविपने सातत्याने वेळोवेळी आवाज उठवला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी निवेदन ते आंदोलन करण्यापर्यंत सर्व स्तरांवर प्रयत्न केले. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचे कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. या निष्काळजी आणि बेफिकीर वृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले आहे. nagpur-university-administration शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रवेश, परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम आणि पदभरती हे महत्त्वाचे घटक आहेत. परंतु, या विद्यापीठाची स्थिती पाहिली तर जी प्रवेश प्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये पूर्ण व्हायला हवी ती लांबत जाऊन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होत नाही. परीक्षेच्या वेळी हॉल तिकीटाची समस्या असो की परीक्षा केंद्रांवर गैरसोयी, यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजघडीला विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थी केंद्रित या सर्व विषयांवर येत्या १३ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ प्रशासनाच्या भ्रष्ट कामकाजाविरोधात विद्यापीठ स्तरावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात प्रामुख्याने प्रवेश, परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम, पदभरती, शिष्यवृत्ती, वसतिगृह, एनईपीची अंमलबजावणी आणि विद्यार्थी संघटना निवडणुका या मुद्यांचा समावेश आहे. दरम्यान, अभाविप वर्धा नगरच्या वतीने ६ रोजी महाविद्यालय बंदची घोषणा दिली आहे.