चांदूर रेल्वे,
municipal-council-chandur-railway चांदूर रेल्वे नगरपरिषदच्या बांधकाम विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लहान कामांच्या निविदांमध्ये ठेवलेल्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) संदर्भातील अटीवरून शहरातील एका कंत्राटदार युवती नगरपरिषदेत ठिय्या मांडून प्रशासनाला धक्का दिला.

नगरपरिषदेकडून १६, १७ आणि २७ ऑक्टोबर रोजी विविध लहान बांधकाम कामांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदांतील अट क्रमांक २२ नुसार कामाच्या ठिकाणापासून २० किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आरएमसी प्लांटचा करारनामा जोडणे बंधनकारक अशी अट ठेवण्यात आली आहे. ही अट केवळ मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असते, मात्र तीच अट लहान कामांसाठी बंधनकारक करण्यात आल्याने शहरातील लहान आणि नवोदित कंत्राटदारांसमोर अडचण उभी राहिली आहे. या अन्यायकारक अटीविरोधात शहरातील युवा शासकीय कंत्राटदार कशिश शर्मा हिने मंगळवारी थेट चांदूर रेल्वेच्या नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडला. तिचा ठाम प्रश्न होता की, ज्या कामांमध्ये काँक्रीटचे प्रमाण अत्यल्प आहे, त्या कामांसाठी आरएमसीचा आग्रह का धरावा? ही अट मोठ्या कंत्राटदारांना लाभदायक आणि लहान कंत्राटदारांना दूर ठेवणारी आहे. प्रारंभी कशिश शर्माने नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांशी चर्चा केली. मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने तिने ठिय्या सुरू ठेवला. स्थानिक नगर परिषद प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कशिश शर्मा हीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर निविदेतील अटीचा अन्यायकारक परिणाम सविस्तर मांडला. municipal-council-chandur-railway जिल्हाधिकार्यांनी तिची बाजू ऐकून घेत सदर अटीचा पुनर्विचार करण्याबाबत नगरपरिषदेला निर्देश देणार असल्याबाबतचे आश्वासन दिल्याचे तिने सांगितले. जोपर्यंत या मागणीचे निराकरण होत नाही तोपर्यंत निविदा उघडू नये अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे शहरातील लहान व मध्यम श्रेणीतील कंत्राटदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नगरपरिषदेच्या अटींवर आवाज उठवणारी ही पहिली युवा महिला कंत्राटदार ठरली असून, तिच्या धाडसाचे शहरात कौतुक होत आहे.