किश्तवारमध्ये चकमक...दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
जम्मू,
Encounter in Kishtwar जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चतरू भागात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीव्र चकमक झाली. दहशतवादी उपस्थित असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन सुरू केले आहे. सुरक्षादलांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतल्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यावर प्रत्युत्तर देत दलांनीही गोळीबार केला असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे.
 
 
Encounter in Kishtwar
 
सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून सील केले आहे, जेणेकरून दहशतवादी पळून जाऊ शकणार नाहीत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चतरूच्या डोंगराळ परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांचा गट गेल्या काही महिन्यांपासून या भागात सक्रिय असून, अलीकडच्या काही संशयास्पद घटनांशी त्यांचा संबंध असल्याचे संकेत आहेत.
व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्स (माजी ट्विटर)वर माहिती देताना म्हटले आहे की, गुप्त माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त ऑपरेशन चतरू सुरू करण्यात आले आहे. दहशतवाद्यांशी संपर्क झाला असून त्यांच्यावर गोळीबार सुरू आहे. दरम्यान, परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व प्रवेश व निर्गमन मार्ग बंद करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन अद्याप सुरू असून, लवकरच दहशतवाद्यांचा पूर्ण खात्मा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत किश्तवार आणि डोडा या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतत सतर्कतेच्या स्थितीत आहे.