श्रीकाकुलम,
Foot massage by female students आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील बंदापल्ली येथील आदिवासी बालिका आश्रम शाळेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्गात शिक्षण चालू असताना एका शिक्षिकेने दोन विद्यार्थिनींकडून स्वतःच्या पायांची मालिश करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका खुर्चीवर आरामात बसलेली दिसते, तर शाळेच्या गणवेशातील दोन विद्यार्थिनी तिच्या पायांजवळ जमिनीवर बसून मालिश करताना दिसतात.

या घटनेमुळे परिसरात आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षिकेच्या या वर्तनाने शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांप्रती वागणूक आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली. सीथमपेटा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी स्वप्नील जगन्नाथ पवार यांनी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर आश्रम शाळांमधील देखरेखीच्या यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. दरम्यान, याआधीदेखील अशाच प्रकारची घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे समोर आली होती. तिथे एका ११ वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या शिक्षिकेने वर्गातच निर्दयीपणे मारहाण केल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सात्विका नागश्री या विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे शिक्षणसंस्थांमधील शिस्त आणि शिक्षकांच्या वर्तनाविषयी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.