पाकिस्तानात सापडले १,२०० वर्षे जुने हिंदू मंदिर

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
खैबर पख्तुनख्वा,
Hindu temple found in Pakistan पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांत पुन्हा एकदा इतिहासाच्या नव्या पानावर झळकला आहे. या भागात सुरू असलेल्या पुरातत्व उत्खननादरम्यान १,२०० वर्षे जुने मंदिर आणि आठ प्राचीन पुरातत्वीय स्थळांचे अवशेष सापडले आहेत. हे मंदिर इस्लामिक देशातही हिंदू संस्कृतीचा ठसा अजून जिवंत असल्याचे प्रतीक ठरत आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बारीकोट परिसरात हे उत्खनन करण्यात आले.
 
 
Hindu temple found in Pakistan
 
इटलीच्या पुरातत्व संशोधकांनी, स्थानिक पुरातत्व संचालनालयाच्या सहकार्याने, हा ऐतिहासिक शोध लावला आहे. इटालियन पुरातत्व मोहिमेचे प्रमुख डॉ. लुका यांनी सांगितले की, बारीकोट येथे मिळालेल्या मंदिराचे बांधकाम सुमारे इ.स. ८व्या शतकातील असल्याचे अंदाज आहे.डॉ. लुका यांनी सांगितले की, मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला ‘बफर झोन’ म्हणून जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उत्खनन मोहिमेला ‘खैबर पथ प्रकल्प’ असे नाव देण्यात आले आहे. तीन वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत सुमारे ४०० स्थानिक कामगारांना वारसा संवर्धन, उत्खनन आणि पर्यटन विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. हा प्रकल्प १ जून २०२५ रोजी सुरू झाला असून, त्याचा उद्देश खैबर पख्तुनख्वातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे.
 
 
या उत्खननादरम्यान मंदिराशिवाय आणखी आठ प्राचीन स्थळे सापडली असून, ती स्वात ते तक्षशिला या ऐतिहासिक पट्ट्यात पसरलेली आहेत. यामुळे या भागात प्राचीन संस्कृतींचा सततचा प्रभाव राहिल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक अभ्यासानुसार, बारीकोट परिसरात प्रागैतिहासिक काळापासून इस्लामिक युगापर्यंत मानवी वस्ती कायम होती. येथे एक प्राचीन किल्लाही सापडला आहे, जो गझनवीद राजवंशाच्या काळाशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने आतापर्यंत ५० हून अधिक पुरातत्वीय स्थळांचा शोध लावला आहे. या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांमुळे हा प्रदेश अलेक्झांडर द ग्रेट, बौद्ध काळ, हिंदू शाही राजवंश, हेलेनिस्टिक संस्कृती आणि इस्लामिक प्रारंभिक काळापर्यंतच्या विविध संस्कृतींचे संगमस्थान असल्याचे सिद्ध झाले आहे. या शोधामुळे पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रदेश केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. इतिहासकारांच्या मते, हा शोध भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक एकात्मतेचा जिवंत पुरावा आहे.