पंजाबमध्ये अलर्ट...पराटी जाळण्याच्या १६००हून अधिक घटना

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
चंदिगढ,
Incidents of burning of parati उत्तर भारतातील हवा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये हवेत धुरक्याचे प्रमाण वाढले असून, त्यामागे शेतकऱ्यांकडून पराटी जाळण्याचे प्रकार प्रमुख कारण ठरत आहे. पंजाबमध्ये भात कापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पराटी जाळण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
 
 
Incidents of burning of parati
शुक्रवारीच राज्यात २२४ नवीन प्रकरणांची नोंद झाली असून, या हंगामात आतापर्यंत एकूण १,६४२ घटना अधिकृतपणे नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या केवळ ७२ तासांतच ६०० हून अधिक ठिकाणी पराटी जाळल्याचे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पराटी जाळण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी ३५३ हॉटस्पॉट गावांची निवड करून त्या ठिकाणी पराटी संरक्षण दल तैनात केले आहे. या दलात ५५० निरीक्षक आणि उपनिरीक्षक सक्रियपणे गस्त घालत असून, स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती मोहिमाही राबवली जात आहे.
 
 
पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात १,६४२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये अमृतसर जिल्ह्यात सर्वाधिक ७५, फिरोजपूरमध्ये ५३, आणि पटियालामध्ये ३६ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारांना जिल्हा व ब्लॉक स्तरावर विशेष अंमलबजावणी पथकं स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पथकांचे उद्दिष्ट म्हणजे गवत आणि पराटी जाळण्यावर कठोर नियंत्रण ठेवणे.
 
गहू पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी पिकांच्या अवशेषांपासून मुक्त होण्यासाठी पराटी जाळण्याचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे तरनतारन, भटिंडा, पटियाला, फिरोजपूर आणि कपूरथला या जिल्ह्यांमध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना पराटी व्यवस्थापनासाठी यंत्रसामग्रीचा वापर, तसेच पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकरी आर्थिक अडचणी आणि वेळेअभावी पराटी जाळणे थांबवत नसल्याचे दिसते, ज्यामुळे पंजाबची हवा पुन्हा एकदा धुरक्याच्या पडद्यात गुरफटली आहे.