खेड,
Leopard enters courtyard in Pune खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक प्रसंग घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळत असलेला एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळेचीवाडी येथील घराच्या कंपाऊंडमध्ये चिमुकला झोक्यावर झोका खेळत होता. दरम्यान, अचानक बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने आत शिरला. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात गोंधळ माजला. चिमुकल्याने प्रसंगावधान राखून क्षणार्धात घराच्या आत धाव घेतली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून परत जंगलाच्या दिशेने पळून गेला.

या घटनेचा व्हिडिओ पाहून स्थानिक नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे. नुकताच शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण अजूनही ताजी असतानाच पुन्हा एकदा बिबट्याचा धोका समोर आला आहे. दरम्यान, शिरूर आणि परिसरातील भागांमध्ये वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत दोन बिबटे जेरबंद झाले असून एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी ३० पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंपरखेड परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून आणखी काही बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांतील बिबटे गुजरात आणि इतर वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा वनविभागाचा निर्णय झाला आहे. तरीदेखील, नागरिकांमध्ये भीती कायम असून प्रशासनाकडून अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.