नवी दिल्ली,
No entry for Zakir Naik in Bangladesh भारताच्या कठोर भूमिकेनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकला देशात प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ढाका येथील गृह मंत्रालयात झालेल्या कायदा आणि सुव्यवस्था कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय दडपणामुळे बांगलादेश सरकारने अखेर या विवादित प्रवचनकाराविरोधात कठोर पाऊल उचलले आहे.

बैठकीत झाकीर नाईकच्या संभाव्य भेटीवर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, झाकीर नाईक बांगलादेशात आल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करावे लागतील, मात्र सध्याच्या परिस्थितीत एवढे मनुष्यबळ उपलब्ध नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गृह व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अखेर झाकीर नाईकच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंट नावाच्या खासगी कंपनीने फेसबुकवर जाहीर केले होते की ते नोव्हेंबरच्या अखेरीस डॉ. झाकीर नाईक बांगलादेश टूर २०२५ आयोजित करणार आहेत. त्यांनी हा कार्यक्रम बांगलादेश सरकारच्या परवानगीने होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, सरकारने आता स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि फरार व्यक्तींना देशात येऊ दिले जाणार नाही.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने झाकीर नाईकच्या संभाव्य भेटीबाबत आधीच चिंता व्यक्त केली होती. या संदर्भात बांगलादेश सरकारने प्रतिक्रिया देताना सांगितले की त्यांनी भारताच्या टिप्पण्यांची दखल घेतली आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस.एम. महबूबुल आलम यांनी एएनआयला सांगितले, आम्ही भारताच्या वक्तव्यांची नोंद घेतली आहे. आमचा ठाम विश्वास आहे की कोणत्याही देशाने दुसऱ्या देशातील फरार आरोपी किंवा वादग्रस्त व्यक्तींना आश्रय देऊ नये. झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये आश्रय घेत आहे. भारतात त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग, धार्मिक द्वेष पसरवणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे गंभीर आरोप आहेत. बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारताचा राजनैतिक दबाव फळाला आला असून, दक्षिण आशियात झाकीर नाईकच्या हालचालींवर आणखी मर्यादा येण्याची शक्यता आहे.