नवी दिल्ली,
Pakistan's religious hatred flares up आज गुरु नानक जयंतीचा पवित्र दिवस प्रकाश गुरुपूरब साजरा होत आहे. या निमित्ताने भारतातून मोठ्या संख्येने शीख आणि हिंदू यात्रेकरू पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे श्री गुरु नानक देव जी यांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाले. मात्र, श्रद्धेच्या या यात्रेत पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले असहिष्णु आणि भेदभावपूर्ण रूप दाखवले. भारताकडून गेलेल्या यात्रेकरूंमध्ये शीखांसोबत १४ हिंदू कुटुंबे होती. परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सीमारेषेवरच या हिंदू यात्रेकरूंना थांबवले आणि अत्यंत अपमानास्पद वर्तन करून त्यांना परत पाठवले. नानकाना साहिबमध्ये शीख यात्रेकरूंचे फुलांनी स्वागत करण्यात आले, पण त्याच वेळी हिंदू यात्रेकरूंना तुमच्या मंदिरात जा, गुरुद्वारात काय काम?” असे म्हणत परत पाठवण्यात आले.

पाकिस्तानातून परत आल्यावर अटारी सीमेवर हिंदू यात्रेकरूंनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दिल्लीतील श्री गंगा राम आणि लखनौतील श्री अमरचंद यांनी सांगितले की त्यांनी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून व्हिसा मिळवून अधिकृतरीत्या यात्रेचा भाग घेतला होता. परंतु वाघा सीमेवरील पाकिस्तानी इमिग्रेशन आणि रेंजर्स अधिकाऱ्यांनी केवळ हिंदू असल्याचे कारण देत त्यांचा अपमान केला. “तुम्ही हिंदू आहात, शीखांच्या गटात का आलात?” असा प्रश्न विचारत त्यांना पाकिस्तानमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
हिंदू यात्रेकरूंनी सांगितले की तेही गुरु नानक देवजींच्या शिकवणीचे अनुयायी आहेत आणि गुरुपूरब त्यांच्या श्रद्धेचा एक भाग आहे. तरीसुद्धा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. अपमान आणि अन्याय सहन करत या कुटुंबांना परत भारतात यावे लागले. दिल्ली, लखनौ आणि नवांशहरमधील या कुटुंबांचे मूळ पाकिस्तानात आहे. त्यांपैकी अनेकांचा जन्म तिथेच झाला होता, मात्र आता ते भारताचे नागरिक आहेत आणि दिल्लीतील फतेहपूर बेरी परिसरात स्थायिक झाले आहेत. अनेक वर्षांपासून त्यांना नानकाना साहिबला भेट देण्याची इच्छा होती, पण पाकिस्तान सरकारने त्यांच्या श्रद्धेला नकार दिला.
भारतीय सूत्रांच्या माहितीनुसार, भारत सरकारने या प्रकाराची नोंद घेतली असून हा मुद्दा पाकिस्तानसमोर औपचारिकरित्या मांडला जाणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चिडलेला असून, हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या कृत्याला भारत धार्मिक आणि राजनैतिक दोन्ही पातळ्यांवर गंभीरतेने पाहत आहे.