राहुल गांधींचा हरियाणात मतचोरीचा आरोप; निवडणूक आयोगाचे उत्तर समोर!

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताच्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, हरियाणामध्ये तब्बल २५ लाख मतदार फर्जी (बनावट) आहेत. राहुल गांधी यांनी मतदार यादीत अनेक ठिकाणी एकाच छायाचित्राखाली अनेक मतदारांची नावे असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ स्थानिक नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही गंभीर स्वरूपाचं आहे.
 
 
rahul gandhi
 
 
 
राहुल गांधी म्हणाले, “आमच्याकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत. हरियाणामध्ये दर आठपैकी एक मतदार बनावट आहे, म्हणजे सुमारे १२.५ टक्के मतदार अस्तित्वातच नाहीत किंवा डुप्लिकेट आहेत. हे सर्व मतदान प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.”
 
ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे ‘एच फाइल्स’ आहेत, ज्यामधून स्पष्ट होतं की संपूर्ण राज्य कसं ‘चोरलं’ गेलं. हे केवळ काही मतदारसंघांत घडलेलं नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घडतं आहे. हरियाणातील आमच्या उमेदवारांकडून आम्हाला अनेक तक्रारी आल्या की काहीतरी बिनसलं आहे, सगळं अपेक्षेपेक्षा उलट घडलं.”
 
राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील मागील निवडणुकांमध्येही अशीच घडामोडी झाल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं, “आम्ही या वेळेस हरियाणात नेमकं काय झालं हे स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.”
 
राहुल गांधी यांनी भारतातील युवक आणि GenZ पिढीला आवाहन करत म्हटलं, “हे तुमच्या भविष्याशी संबंधित आहे. म्हणूनच मी भारतातील निवडणूक आयोग आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करीत आहे. आम्ही हे १०० टक्के पुराव्यांसह करत आहोत. काँग्रेसच्या मोठ्या विजयाला पराभवात बदलण्यासाठी नियोजनपूर्वक डाव रचला गेला होता, याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
 
निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर
 
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, मतदार यादीविरुद्ध आतापर्यंत एकही अधिकृत अपील दाखल झालेलं नाही. हरियाणातील ९० विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ २२ निवडणूक याचिका सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
 
सूत्रांनी काँग्रेसकडे प्रश्न उपस्थित करत म्हटलं – मतदान केंद्रांवरील काँग्रेसचे पोलिंग एजंट काय करत होते? जर एखाद्या मतदाराबद्दल शंका होती, तर त्यांनी तत्काळ आक्षेप नोंदवायला हवा होता. पुनरीक्षण किंवा सुधारणा प्रक्रियेदरम्यान काँग्रेसकडून कोणतीही औपचारिक तक्रार किंवा आक्षेप नोंदवला गेला नाही.
 
आयोगाने आणखी सांगितले की, “घर क्रमांक शून्य (०) अशा नोंदी त्या ठिकाणांसाठी असतात जिथे स्थानिक प्रशासनाने अद्याप घर क्रमांक दिलेले नाहीत. राहुल गांधींनी दाखवलेले काही व्हिडिओ केवळ अर्धे दाखवले गेले आहेत.”
 
तसेच आयोगाच्या सूत्रांनी विचारलं की, “जर राहुल गांधी नागरिकत्व सत्यापन (SIR) प्रक्रियेला विरोध करत असतील, तर मग ते डुप्लिकेट, मृत किंवा स्थलांतरित मतदार काढून टाकण्यास का विरोध करतात?”
 
निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की, मतदार यादी तयार करताना सर्व आवश्यक तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते, आणि कोणताही पक्ष किंवा उमेदवार सुधारणा प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेऊ शकतो. काँग्रेसने जर ते केलं नाही, तर आता आरोप करणं उचित नाही.
 
 
राहुल गांधींची संपूर्ण पत्रकार परिषद येथे ऐका-