- रातुम नागपूर विद्यापीठ व आयसीसीएस यांचा सामंजस्य करार
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन आणि सांस्कृतिक अभ्यासाच्या क्षेत्रात मोठे पाऊल उचलत इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या प्रतिष्ठित संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, लोककला, भाषा, मीडिया आणि विज्ञान यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास करता येणार आहे. हा करार विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयसीसीएसचे उपाध्यक्ष बाळकृष्ण चौबाळ, डॉ. एस. पी. गाडगे आणि मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व्यावसायिक कौशल्य, संशोधनाच्या संधी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागतिक पातळीवरील शैक्षणिक देवाणघेवाणीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची परस्पर देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, तज्ज्ञ व्याख्याने, कार्यशाळा आणि नवोन्मेष कार्यक्रमही राबवले जातील.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University आयसीसीएस ही संस्था भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून ती विविध देशांतील विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसोबत सहयोग करते. धर्म, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्र या क्षेत्रातील संशोधकांना ती फेलोशिपही प्रदान करते. या कराराच्या अनुषंगाने नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाने आयसीसीएसच्या सहकार्याने दोन नवे पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत, ज्यांतून विद्यार्थ्यांना आफ्रिकन आणि आर्मेनियन संस्कृतींचाही अभ्यास करता येणार आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक संदर्भात शिक्षण मिळून त्यांचा सर्वांगीण बौद्धिक आणि व्यावसायिक विकास होण्यास मदत होणार आहे.