नागपूर,
Theft of bones from a cemetery जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील भिवापूर रोडवरील स्मशानभूमीतून दोन प्रेतांच्या अस्थी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. नुकताच अशाच प्रकारचा प्रकार जळगाव जिल्ह्यातही समोर आला होता, त्यामुळे तंत्रविद्या आणि अंधश्रद्धेचा संशय अधिक गडद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी उमरेड येथील 23 वर्षीय साक्षी पाटील आणि 47 वर्षीय नरेश सेलोटे या दोघांचे अंत्यसंस्कार त्यांच्या नातेवाईकांनी पारंपरिक रीतीने पूर्ण केले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थी संकलनासाठी कुटुंबीय स्मशानभूमीत गेले असता, त्यांनी चिता ठिकाणी अस्थी पूर्णपणे गायब झाल्याचे पाहून हादरले. क्षणात ही माहिती पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
नातेवाईकांनी तात्काळ उमरेड पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक चौकशीत कोणीतरी तंत्रविद्या किंवा काळ्या जादूसाठी अस्थी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनीही याआधी परिसरात अशा अफवा ऐकल्या असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही घटना अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याशी संबंधित असल्याची शक्यता पोलिस नाकारत नाहीत.
घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा, अंधश्रद्धा प्रतिबंध आणि काळी जादू विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयास्पद हालचालींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी अशा अंधश्रद्धेच्या आणि जादूटोण्याच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.