बेंगळुरू,
Actor Harish Rai passes away कन्नड चित्रपटसृष्टीतून दुखद बातमी समोर आली आहे. ‘केजीएफ’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेले अभिनेता हरीश राय आपल्यात नाहीत. ६३ वर्षीय हरीश राय दीर्घकाळ घशाच्या कर्करोगाशी झुंजत होते आणि गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या घशाचा कर्करोग त्यांच्या पोटात पसरला होता, ज्यामुळे त्यांना सूज आणि आजाराची तीव्रता जाणवत होती. बेंगळुरू येथील किडवाई रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांना आजारावर मात करता आली नाही.
हरीश राय यांनी १९९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट “ओम” मध्ये आपली कला सादर केली, तर “डॉन रॉय” मधील त्यांची भूमिका घराघरात पोहोचली. त्यानंतर त्यांनी तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये विविध भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली. केजीएफ मध्ये त्यांनी रॉकीच्या काकांची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. केजीएफ २ च्या शूटिंगदरम्यानच त्यांना कर्करोगाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. मानेवरील सूज लपवण्यासाठी त्यांनी चित्रपटात दाढी वाढवली होती, असे हरीश राय यांनी स्वतः सांगितले होते. अभिनेते आणि चाहत्यांसाठी हरीश रायच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा निर्माण झाली आहे.