अजेंटिक एआयची वेधक वाट

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
तंत्रवेध
डॉ. दीपक शिकारपूर
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा परवलीचा शब्द आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील झेप नजीकच्या काळात अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील. गेल्या काही वर्षांमध्ये जेन आय टूल्स (उदा जेमिनी, चॅटजीपीटी)चा वापर वाढला. झटपट ज्ञानप्राप्तीसाठी अनेक विद्यार्थी आज त्यांचा वापर करतात. त्यामुळे माहितीची (अगदी चित्र, ध्वनी, व्हिडीओसकट) निर्मिती करणे व सुपरफास्ट झाले. आता पुढचा टप्पा गाठायची वेळ आली आहे. त्यासाठी Agentic AI अजेंटिक एआय समजून घेणे महत्वाचे आहे. अजेंटिक एआय केवळ ‘स्मार्ट’ नाही, तर ‘स्वायत्त’ आहे. म्हणजेच, हे एआय स्वतः विचार करून कृती करू शकते. त्यामुळे डिजिटल सहकार्याचे रूप बदलू शकते. स्मार्ट म्हणजे मानवी उत्पादकता वाढवणार्‍या प्रणाली आणि उत्पादने. अजेंटिक त्याच्या पुढची पायरी आहे. अजेंटिक एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, जी विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वायत्तपणे कार्य करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मर्यादित मानवी देखरेखीसह कृती करू शकते. हे पारंपरिक एआयच्या पलीकडे जाणारे एक पाऊल आहे. अजेंटिक एआय सिस्टिममध्ये अनुभवातून शिकण्याची, गतिमान वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि जटिल उद्दिष्टे करण्यासाठी इतर एआय सिस्टिमशी सहयोग करण्याची क्षमता अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे थोडेफार मानवी मेंदूसारखे आहे. यामुळे एआय अधिक प्रभावीपणे मानवासारखा विचार आणि सहयोग करू शकते.
 
 
Egentic-AI
 
Agentic AI अजेंटिक एआय एजंट म्हणजे अशी एआय प्रणाली, जी आपल्या माहितीजालातून माहिती गोळा करते, स्वत: शिकलेल्या अनुभवांवर आधारित तर्क करते आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बहु-टप्प्यांची पूर्ण करते. हे एजंट्स जटिल समस्यांना लहान उप-कार्यांमध्ये विभागतात, साधने वापरतात आणि अंतिम ध्येय गाठेपर्यंत सतत स्वत:च्या कृतींचे मूल्यांकन करतात. थोडक्यात, हे एजंट्स जनरेटिव्ह एआयच्या निर्मितीक्षमतेचा वापर करून, त्याला कार्यान्वित करणारी एक निर्णायक शक्ती प्रदान करतात. यात मानवी हस्तक्षेप मर्यादित असतो. पारंपरिक एआयच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असणारी अजेंटिक एआय काम करू शकते. ही यंत्रणा अनुकूलता पूर्व-परिभाषित नियमांचे पालन करत अनुभवातून शिकते आणि बदलांशी जुळवून घेते. स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. गुंतागुंतीची तसेच सोपी कामे आणि कार्यप्रवाह हाताळते. जटिल, बहु-चरणीय कार्ये हाताळते. अजेंटिक एआयचा उद्योगक्षेत्रात मोठा प्रभाव पडत आहे. भविष्यात हा प्रभाव अधिक वाढणार आहे. याचा वापर करून उद्योग अधिक उत्पादक आणि स्पर्धात्मक बनू शकतात. शिक्षणक्षेत्रात हे तंत्र महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. शिक्षक एआयकडे एक सहयोगी म्हणून पाहतील. सध्या पारंपरिक शिक्षणव्यवस्थेमध्ये शिक्षकांना अनेकदा अशैक्षणिक (कारकुनी) काम मोठ्या प्रमाणावर करावे लागते. हे काम अजेंटिक एआय करू शकते. त्यामुळे शिक्षकांची शैक्षणिक उत्पादकता अनेक पटींनी वाढेल.
 
 
Agentic AI अजेंटिक एआय विशेषतः विज्ञान आणि अभियांत्रिकी व्हर्च्युअल लॅब्ज आणि इमर्सिव्ह लर्निंग वातावरणाची निर्मिती करेल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासारखे शिक्षण मिळेल. अनेकदा प्रात्यक्षिकांसाठी उद्योगांमध्ये प्रत्यक्ष भेट आवश्यक ठरते. आता त्याची गरज राहणार नाही. आपल्या संगणकावर आणि पडद्यावर आपण उन्नत अनुभव घेऊ शकू. एआय-आधारित मूल्यांकन प्रणाली अधिक अचूक, जलद आणि वैयक्तिककृत अभिप्राय देतील. परीक्षा पद्धतींमध्ये बदल करून प्रत्यक्ष कौशल्यांचे मूल्यांकन करण्यावर भर दिला जाईल; केवळ स्मरणशक्तीवर भिस्त राहणार नाही. ही पद्धत सरावासाठी मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे पृथक्करण करून विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्न आणि नंतर अचूक उत्तरे सांगू शकते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होतील तसेच आपल्या उत्तरांचे पृथक्करण करून कुठे जास्त अभ्यासाची गरज आहे हे घेतील. पारंपरिक गाईड्सना याचा मोठा धोका आहे. कसा अभ्यास करून जास्त गुण मिळवता येऊ शकतील याचे मार्गदर्शन अजेंटिक एआय विद्यार्थी आणि शिक्षकांना देईल. याचा मोठा फायदा ग्रामीण आणि निमशहरी भागातील शैक्षणिक संस्थांना होईल कारण अशा ठिकाणी चांगले शिक्षक मिळणे अवघड असते.
 
 
Agentic AI अजेंटिक एआय एजंट या नव्या पिढीतील स्वायत्त प्रोग्राममुळे अधिक स्मार्ट, वेगवान आणि व्यक्तिगत बनली आहे. अजेंटिक एआय एजंट वैयक्तिक डिजिटल शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी हवे तसे मार्गदर्शन करून देतील. हे एजंट विद्यार्थ्याची क्षमता आणि कमतरता ओळखून शिकण्याचा रास्त मार्ग निवडतात. शिक्षकांना वेळ वाचवण्यासाठी हे एजंट्स परीक्षा तपासणी, उपस्थिती मापन, गृहपाठ मदत व निकालवर्धन असे फायदे देतात. विज्ञान व अभियांत्रिकी व्हर्च्युअल लॅब्ज, इमर्सिव्ह लर्निंग अनुभव देत ग्रामीण आणि निमशहरी संस्थांसाठी शिक्षणाची दारे खुली करतात. साधनसंपत्तींची कमतरता असलेल्या शाळा तसेच महाविद्यालयांसाठी हे फारच उपयुक्त आहे. शिकण्याचे नवे क्षितिज खुले होत असताना डेटाची गोपनीयता आणि तंत्रज्ञानाचा समावेश ग्रामीण भागात वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अजेंटिक एआय टूल्स केवळ प्रयोगशाळांपुरती मर्यादित नाहीत. टूल्स आता व्यवसाय आणि शिक्षणक्षेत्रात प्रत्यक्षात वापरली जात आहेत एकंदरीत, अजेंटिक एआयमुळे भारतातील उद्योग आणि शिक्षणक्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील. उत्पादकतेत वाढ, नवीन नोकर्‍यांची निर्मिती आणि शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची क्षमता यात आहे. मात्र, यासोबतच कौशल्य अंतर, डेटा गोपनीयता आणि नैतिक वापर यांसारख्या आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे; जेणेकरून या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. भविष्यात, हे एजंट्स अधिक चतुर आणि संवादात्मक बनतील. येत्या काही वर्षांमध्ये हे एजंट्स उद्योगांची कार्यक्षमता वाढवून आणि मानवी कामाचे स्वरूप बदलवतील.
‘एआय २०३० इंडिया’ उपक्रम ही सरकार-समर्थित योजना आहे. भारताला २०३० पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक नेता म्हणून स्थान देणे हा याचा उद्देश नैतिक अंमलबजावणी आणि सामाजिक प्रभावावर जोरदार भर देऊन भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आणि जबाबदार एआय अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करणे, हे या तंत्राचे ध्येय मानले गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, नॅसकॉम आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंडिया नेतृत्व करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे एकविसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी तंत्रज्ञान आहे आणि भारताने याचा उपयोग करून सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार केला आहे. ‘एआय फॉर इंडिया २०३०’ धोरण भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. 
 
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)