सिंदी (रेल्वे),
Artificial shortage of urea जमिनीत ओल असल्यामुळे युरियासाठी गेलेल्या शेतकर्यांना सध्या युरिया सहज मिळत नाही. लिंकिंगच्या सतीमुळे कृषी व्यावसायिक देखील हैराण झाल्याचे दिसते. तीन बॅग युरिया घेतल्यास एक पेटी बायो पोटॅशची सती करणे सुरू असल्याची ओरड आहे. या संदर्भात कानोसा घेतला असता, युरियाची टंचाई असल्यामुळे जिल्हा वितरकांनी हा फंडा शोधला आहे. तीन बॅग युरियासाठी शेतकर्याला ७९८ रुपये मोजावे लागतात. परंतु, लिकिंगच्या नावाखाली शेतकर्यांना एक पेटी बायो पोटॅश घ्यावे लागते. पोटॅश घेताना शेतकर्यास १२५० रुपयांचा भूर्दंड बसतो. याचाच अर्थ ३ बॅग युरिया २०४८ रुपयात पडत आहे.
आधीच नापिकीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांची लिंकिंगच्या माध्यमातून नकळत लूट केली जात आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी लक्ष पुरविण्यास तयार नाही, अशी सर्वसाधारण तक्रार आहे. या भागातील अनेक कृषी व्यवसायिकांनी हे अनाठायी झेंगट नको, असे समजून युरीया उपलब्ध नाही सागण्यास सुरुवात केली आहे. युरीया विकतांना कृषी सेवा केंद्र चालकांना पदरमोड करावी लागते, त्यात लिंकिंग करतांना बिल देता येत नाही. परिणामी, हा फाजील व्यवहार न केलेला बरा, असे समजून शेतकर्याला वार्यावर सोडल्याचे स्पष्ट दिसून येते. अनेक चतुर व्यापारी या संधीचा लाभ घेत मिश्र खतें विकतांना सुध्दा लिकिंग करतात, असे समजले.