गडचिरोलीमध्ये भाजपात नव्या नेतृत्वाची मागणी

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
गडचिरोली, 
BJP leadership in Gadchiroli गडचिरोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नव्या नेतृत्वाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांपासून तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सर्वत्र भाजपाने आता नवीन, स्वच्छ प्रतिमेच्या आणि जनतेत मिसळणार्‍या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या विचारांचे, नव्या उर्जेचे नेतृत्व आवश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्या रूपाने भाजपाला एक शिक्षित, विचारवंत आणि कार्यक्षम चेहरा मिळू शकतो. प्रणोती या सामाजिक जाण असलेल्या आणि विविध उपक्रमांमधून महिलांबरोबरच युवकांशी सातत्याने संपर्कात राहणार्‍या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
 
 
प्रणोती निंबोरकर
 
त्यांनी अलीकडेच आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पक्षाच्या धोरणांबद्दल जनजागृती करण्याचे कामही सुरू केले आहे. शहरातील अनेकांनी त्यांच्या नेतृत्वक्षमता आणि संघटनकौशल्याची दखल घेतली असून, भाजपाने जर प्रणोती निंबोरकर यांना संधी दिली, तर पक्षाची प्रतिमा अधिक बळकट होईल आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मजबूत पर्याय निर्माण होईल, असा सूर व्यक्त होत आहे. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही प्रणोती निंबोरकर यांचे नाव पसंतीस पडले असून, त्यांनी पक्ष उच्चस्तरीय नेतृत्वापर्यंत ही मागणी पोहोचवण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील तरुण वर्गात त्यांच्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.
 
 
शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन या क्षेत्रात त्यांनी घेतलेला पुढाकार आणि सकारात्मक दृष्टी यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा आहे. प्रणोती निंबोरकर या सक्षम महिला नेतृत्व आणि स्वच्छ प्रतिमेचे प्रतीक आहेत. त्यांना नगराध्यक्ष पदावर संधी मिळाल्यास शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकीत भाजपा जुन्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवणार की नव्या ऊर्जेच्या, ताज्या नेतृत्वावर भर देणार, हा निर्णय आता गडचिरोलीच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहे.