चिखली,
Brutal murder of parents चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मंगळवारी रात्री (५ नोव्हेंबर) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ४२ वर्षीय मुलाने आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मृतांमध्ये ७५ वर्षीय सुभाष दिगंबर डुकरे, त्यांची ६५ वर्षीय पत्नी लता सुभाष डुकरे, आणि ४२ वर्षीय मुलगा विशाल सुभाष डुकरे यांचा समावेश आहे. हे तिघेही एकाच घरात राहत होते.

प्राथमिक माहितीप्रमाणे, मुलगा विशालला शेत जमिनीच्या मुद्द्यावर आई-वडिलांशी वाद होता आणि दारूच्या नशेत या क्रूर कृत्याला तोंड दिले असावे. घटना समजताच चिखली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार भूषण गावंडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाची पाहणी करत आहेत. घर पूर्णपणे सील केले गेले असून, पंचनामा आणि फॉरेन्सिक तपासणी सुरु आहे. घटनास्थळावर कुऱ्हाड, रक्ताचे डाग, बोटांचे ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तिन्ही मृतदेहांचे उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात फिर्याद दाखल केली असून, तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. एस. चौहान करत आहेत. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून घडलेल्या या तिहेरी हत्या-आत्महत्येने सावरगाव डुकरे गावात हळहळ पसरवली आहे.