‘चंद्रपूर टायगर सफारी’ प्रकल्पाला मिळणार परवानगी

* केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत बैठक * आ. जोरगेवारांची यांची माहिती

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर, 
Chandrapur Tiger Safari Project : चंद्रपूरच्या मूल रस्त्यावरील वन अकादमीजवळील 171 हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती आ. किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
 
 
jjlj
 
 
गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांसोबतच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच प्राधिकरणाची अधिकृत बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल, असे जोरगेवार यांनी सांगितले. या बैठकीला भारत सरकारचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, एफडीसीएम गोरवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड नागपूरचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते.
 
 
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती त्यांनी घेतली होती. चंद्रपूरच्या वन अकादमीजवळ उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
 
या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. पर्यटकांना येथे कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी तसेच देशी आणि विदेशी प्राणी पाहता येणार आहेत. याशिवाय, 44 हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी, 20 एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
 
विदर्भातील 10 वाघांचे होणार कोल्हापूर येथे पुनर्वसन
 
 
चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत चालली आहे. वनक्षेत्रातील वाघांची वाढती संख्या, घटणारे अधिवास क्षेत्र आणि मानव वस्त्यांच्या सीमारेषा ओलांडणारे वाघ यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर सुमारे 10 वाघांचे कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहितीही आ. जोरगेवार यांनी दिली.