इस्लामाबाद,
Discussion of Bihar elections in Pakistan बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असुन त्याचा परदेशातही आवाज पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावर बिहार निवडणुकीचे वृत्तांकन प्रकाशित केले आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की, या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारसाठी “अग्निपरीक्षा” ठरणार आहेत. अहवालानुसार, सध्या मोदी सरकार अल्पसंख्याकात असून मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (TDP) हे दोन पक्ष मोदी सरकारच्या स्थैर्याचे आधारस्तंभ मानले जात आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप २४० जागांवर घसरला होता. त्यानंतर नितीश कुमार यांच्या १२ आणि चंद्राबाबू नायडू यांच्या १६ खासदारांच्या पाठिंब्यामुळे सरकार बहुमताच्या आकड्यापर्यंत म्हणजेच २७२ वर पोहोचले. या दोन्ही नेत्यांच्या निर्णयांवरच मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. वृत्तपत्रानं स्पष्ट केलं आहे की, जर बिहार निवडणुकीत एनडीएला फटका बसला आणि नितीश कुमार यांचा राजकीय दृष्टिकोन बदलला, तर केंद्र सरकारलाही अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. भाजपकडे सध्या साध्या बहुमतापेक्षा फक्त २१ खासदार जास्त आहेत, त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशातील सहयोगी पक्षांचा आधार कायम ठेवणं ही मोदींसाठी मोठी राजकीय कसरत आहे.
ही निवडणूक केवळ मोदी सरकारसाठीच नव्हे, तर राहुल गांधींसाठीही निर्णायक ठरणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं काही प्रमाणात पुनरागमन केलं असून राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून पुढे आले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील काँग्रेस–समाजवादी आघाडीच्या कमकुवत कामगिरीमुळे केंद्रातील मोदी सरकारचा आधार कमी झाल्याचंही वृत्तपत्रानं नमूद केलं आहे. या संपूर्ण विश्लेषणातून पाकिस्तानातील माध्यमांनी भारताच्या राजकीय समीकरणांकडे किती बारकाईने लक्ष ठेवलं आहे, हे स्पष्ट होतं. बिहार निवडणुकीचे निकाल केवळ राज्याचं भविष्य नाही, तर केंद्र सरकारचं समीकरणही बदलवू शकतात, असा अंदाज लेखात व्यक्त केला आहे.