वाशीम,
Electricity distribution company एकांबा येथील पाणी पुरवठा योजनेचे रोहित्र जळाल्यामुळे मागील तीन आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्या पाठोपाठ गावातील गावठाण फिडरचे रोहित्र सुद्धा जळाल्याने एकांबा गावात मागील पाच दिवसापासून अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावठाण फिडर वरील रोहित्र बदलताच काही क्षणातच जळत असल्याने रोहित्र दुरुस्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून केल्या जात आहे.

एकांबा गावातील गावठाण फिडर वरील रोहित्र पाच दिवसापुर्वी जळाले. हे रोहित्र बदलण्यासाठी वीज ग्राहकांनी वितरण कंपनीच्या अधिकार्याकडे पाठपुरावा केल्यानंतर नवीन रोहित्र बसविले. पण ते नविन रोहित्र काही क्षणातच जळाले. त्यानंतर पुन्हा दुसरे रोहित्र आणून बसविले, ते सुद्धा काही क्षणातच जळाले. आता एकांबा येथील नागरिक तिसर्या रोहित्राची तिन दिवसापासून वाट पाहत असून तिसरे रोहित्र पण जळते का? असा प्रश्न मागील पाच दिवसापासून अंधारात राहणार्या त्रस्त नागरिकांकडून केल्या जात आहे. तसेच गावातील पाणी पुरवठा योजनेचे रोहित्र मागील तिन आठवड्यापासून जळाल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सद्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने गावातील पुरूष मंडळी व महिला मंडळीना दररोज पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि रोहित्र दुरूस्तीचे ठेकेदार यांच्या संगनमताने रोहित्र दुरूस्ती मधील भ्रष्टाचार सुरू असल्यानेच वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रोहित्र बसविल्यानंतर काही क्षणातच जळत असल्याचे प्रकार वाढले असल्याची वीज ग्राहकांमध्ये चर्चा सुरू आहे. मागील पाच दिवसापासून अंधारात राहणार्या एकांबा येथील जनतेला वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नवीन चांगल्या दर्जाचे रोहित्र देवून न्याय द्यावा. तसेच पाणी पुरवठा योजनेचे रोहित्र बदलून पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा, अशी एकांबा वासियांनी मागणी केली आहे.