ट्रान्सपोर्ट नगरातील १२५ दुकाने हटविली

महापालिकेची मोठी कारवाई

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
encroachment : अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी अमरावती महापालिका प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार गुरूवारी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
 
 
jkj
 
ट्रान्सपोर्ट नगर हा परिसर दीर्घकाळापासून विविध व्यापार्‍यांनी व्यापलेला असून, येथे साधारणतः ३०० दुकाने असल्याची माहिती आहे. त्यापैकी अनेक दुकाने व टिनशेड रचना परवानगीशिवाय उभारण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान अनधिकृत खोके व शेड हटविण्यात आले असून, ही कारवाई पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
 
 
कारवाईसाठी अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे पथके तयार केली होती. संपूर्ण कारवाईदरम्यान तीन जेसीपी मशीन आणि तीन मोठे ट्रक सतत कामावर तैनात होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवत कारवाईदरम्यान कोणताही अनुशासनभंग होऊ नये याची काळजी घेतली. 
 
 
मनपा अधिकार्‍यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक रस्ते, फूटपाथ आणि वाहतूक मार्ग व्यापणार्‍या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला असून, ही मोहीम टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व भागांमध्ये राबविण्यात येईल.
 
 
महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील उर्वरित १७५ अनधिकृत दुकाने देखील हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नागरिक व व्यापार्‍यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे दूर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.