चिमूर,
Farmer killed in tiger attack near Chimur तालुक्यातील शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणारीठ परिसरातील शेतात कापूस वेचत असताना वाघाने शेतकर्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी, 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ईश्वर भरडे (52) असे मृतकाचे नाव आहे. ईश्वर भरडे दुपारी 12 वाजता शेतातील कापूस वेचण्यासाठी गेले होते. सायंकाळ झाल्यानंतरही घरी परत आले नसल्याने कुटुंबीयांसह काही नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी शेताजवळ त्यांची सायकल दिसून आली. त्यानंतर शेतातच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा होत्या आणि हाताचा एक भागही वाघाने खाल्ला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत शंकरपूर-आंबोली मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकर्यांकडून रेटून धरण्यात आली. गावकर्यांनी भरडे यांचा मृतदेह उलचून शंकरपूर भिसी रस्त्यावरील आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टवर ठेवला. जोपर्यंत वाघाला ठार मारण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली. यामुळे वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनाकडून गावकर्यांची समजूत काढली जात आहे. गेल्या महिनाभरात शंकरपूर परिसरात वाघाच्या हल्ल्याची तिसरी घटना असून, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतरही वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. रात्री बराचवेळ आंदोलन सुरू होते.