ढाका,
India stops onion exports in Bangladesh भारताने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर बांगलादेशात प्रचंड गोंधळ माजला असून कांद्याचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. अवघ्या काही दिवसांत दर दुप्पट वाढले आहेत आणि सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील अर्थसंकल्पाचं गणित पूर्णपणे बिघडलं आहे. राजधानी ढाका, चितगाव, राजशाही आणि खुलना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर ११० ते १२० टका प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी हेच दर ६० टका प्रति किलो होते.
किरकोळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे की घाऊक बाजारातही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांकडून अधिक किंमत आकारावी लागत आहे. एका वृत्तानुसार, देशातील स्थानिक कांदा साठा संपत आला आहे, आणि भारताकडून होणारी आयात अचानक थांबल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. भारत सरकारने देशांतर्गत दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू केली, मात्र त्याचा थेट परिणाम बांगलादेशातील बाजारपेठांवर झाला.
चितगाव आणि राजशाहीतील आयातदारांच्या मते, भारतातून पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत किंवा देशांतर्गत नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर अजून वाढू शकतात. दरम्यान, बांगलादेश ग्राहक संघटनेने या दरवाढीला ‘अन्याय्य आणि कृत्रिम’ ठरवत काही व्यापाऱ्यांवर टंचाई निर्माण करून नफा कमावण्याचा आरोप केला आहे. या वर्षी रब्बी हंगामातील कांद्याची कापणी उशिरा झाल्याने स्थानिक बाजारपेठांतील पुरवठा मर्यादित आहे. सामान्यतः ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कापणी पूर्ण होते, मात्र यंदा ती विलंबाने होत आहे. आयातदार आणि व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की, जर सरकारने ताबडतोब आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली, तर दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेतील किंमतींना स्थिरता मिळू शकते. मात्र तज्ञांचं मत आहे की, तात्पुरत्या उपायांपेक्षा कडक बाजार निरीक्षण आणि नियोजनबद्ध आयात धोरण हाच दीर्घकालीन उपाय ठरू शकेल.