वॉशिंग्टन,
IT sector under threat of job cuts जागतिक अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा मंदीचे सावट गडद होत चालले आहे. या आर्थिक वादळाचा सर्वाधिक फटका बसत आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना. गेल्या काही वर्षांपासून अमेजॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा,टीसीएस यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे झुकत, मानवी श्रमांवर होणारा खर्च कमी करण्याचा मार्ग अवलंबला. परिणामी अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना आपल्या गडगंज पगाराच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आता या यादीत आणखी एका दिग्गज कंपनीचा समावेश होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे ती म्हणजे आयबीएम (IBM).
‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, येत्या तिमाहीत आयबीएममधून हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. सध्या या कंपनीत सुमारे २.७ लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी मोठ्या संख्येने नोकऱ्या धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. आयबीएमचा हा निर्णय ही केवळ खर्चकपातीची पाऊलवाट नसून, कंपनीच्या भविष्यातील रणनीतीचा भाग असल्याचं समोर आलं आहे. कंपनी आता सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस क्षेत्रावर, विशेषतः क्लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सेवांवर अधिक भर देणार आहे. भविष्यातील नफा वाढवण्यासाठी आणि कार्यक्षमतेत सुधारणा साधण्यासाठी या नोकरकपातीची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली ‘रेड हॅट’ डिव्हिजनअंतर्गत क्लाऊड आणि एआय सेवा विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. वाढत्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नफा मिळवण्याच्या उद्देशाने कंपनीने आपल्या कामकाजाच्या रचनेत फेरबदल सुरू केले आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केवळ आयबीएमपुरती मर्यादित राहील असे वाटत नाही. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सध्या खर्चकपातीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांवर भविष्यातील अनिश्चिततेचं ढग दाटून आले आहे. आता आयबीएमकडून होणारी ही छाटणी नेमक्या किती कर्मचाऱ्यांवर गारद घालते, याकडे जागतिक उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.