तर लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची मुदतवाढ शक्य!

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
मुंबई,
KYC of Ladki Bhain Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या योजनेपुढे मोठे तांत्रिक आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे लाखो महिलांच्या खात्यात दरमहा ₹१५०० रुपयांचा लाभ जमा होत असतानाच, दुसरीकडे केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी अडचणीत सापडल्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण २.४० कोटी लाभार्थींपैकी केवळ ८० लाख महिलांचीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित महिलांची पडताळणी अद्याप सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. काहींना ओटीपी न मिळणे, काहींच्या आधार कार्डाशी बँक खातं न जुळणे अशा समस्या वारंवार येत आहेत.
 
 
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो 
अदिती तटकरे यांनी सांगितले की, १८ नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवण्यात आली असून, दररोज ५ लाखांऐवजी १० लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण राहिल्यास परिस्थितीनुसार मुदतवाढ देण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधवा आणि घटस्फोटित महिलांना ई-केवायसी करताना सर्वाधिक अडचणी येत आहेत. पती वा वडील हयात नसल्याने त्यांची ओळख पडताळणी अडखळत आहे. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल, असेही तटकरे यांनी नमूद केले.
 
लाडकी बहीण योजनेतील काही बोगस लाभार्थी आढळून आल्यानंतर प्रशासनाने २६ लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले होते. त्यापैकी २० लाख लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्याने त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, अद्याप ६ लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. त्यांची फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी सुरू आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे सात हजार महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार आहे. राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणाऱ्या या योजनेत केवायसीचा अडथळा मोठ्या प्रमाणात जाणवत असला तरी, सरकारने तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.