कुर्हा,
rajesh-wankhade : विदर्भकन्या श्री रुक्मिणी मातेचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरा येथे कार्तिक मासानिमित्त आयोजित साप्ताहिक उत्सवात गुरूवारी आमदार राजेश वानखडे यांनी सपत्नीक सहभाग घेतला. प्रातःकाळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आणि अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या तसेच शेतकर्यांच्या सुख-समृद्धीची मनोकामना केली.
कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमेला आणि प्रतिपदेला दहीहंडीचा सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. हा सोहळा हजारो वारकर्यांच्या उपस्थितीत होतो आणि या सोहळ्याची शतकानुशतके परंपरा आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कार्तिक मास उत्सवाचा भाग म्हणून, हा सोहळा साजरा होतो. गुरूवारी कार्तिक प्रतिपदेनिमित्त आयोजित दहीहंडी सोहळा हजारो वारकर्यांच्या व पालखी, दिंड्याच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. या सोहळ्यात सालाबादप्रमाणे नागरिक उत्साहाने सहभागी झाले आणि भक्तिमय वातावरणात दहीहंडी सोहळा झाला.
मंदिर परिसर वारकर्यांच्या जयघोषाने दुमदुमला आरती राजेश वानखडे यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी माता रुक्मिणीच्या चरणी तिवसा मतदारसंघातील नागरिकांच्या मांगल्याची प्रार्थना केली. त्यांच्यासह उपस्थित भक्तांनी मंदिरात पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला. माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर हे विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. कार्तिक मासातील हे उत्सव भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहेत. शेतकरी, नागरिक आणि संपूर्ण जिल्ह्याच्या कल्याणासाठी मी माते समोर प्रार्थना केली आहे, असे आमदार राजेश वानखडे यांनी याप्रसंगी सांगितले. या सोहळ्याला स्थानिक नागरिक, वारकरी संप्रदायाचे मानकरी, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाची सांगता प्रसाद वितरणाने करण्यात आली.