महाराष्ट्राला थंडीची चाहूल! तापमान घटणार!

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Maharashtra braces for cold weather राज्यात गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम होता. परतीच्या पावसानं आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यानं वातावरण आर्द्र आणि अस्थिर केलं होतं. पण आता अखेर राज्यभर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तासात तापमान घटण्याचा अंदाज वर्तवला असून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात गारवा वाढणार आहे.
 
Maharashtra braces for cold weather
 
मुंबई, ठाणे, रायगड, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत आज (6 नोव्हेंबर) हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु 7 नोव्हेंबरपासून हवामानात स्पष्ट बदल होणार असून कोरडे आणि थंड वातावरण निर्माण होईल, असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वादळी वाऱ्यासह पावसामुळे मुंबई आणि कोकण परिसर ओलसर वातावरणात होता. आता मात्र या ओलाव्याला पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसा उखाडा जाणवेल, पण पहाटे आणि रात्री हवेत गारवा वाढेल.
 
 
दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत असून हवामान कोरडे होऊ लागले आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांच्या पेरण्यांवर परिणाम झाला होता. आता तापमान घटल्याने आणि आकाश स्वच्छ झाल्याने पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांची तीव्रता ओसरत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सकाळ-संध्याकाळ गारवा वाढेल आणि हवामानात खऱ्या अर्थाने बदल जाणवेल.