अल्पवयीन खेळाडू मुलीवर तब्बल ६४ जणांच्या क्रूर बलात्कार!

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
तिरुअनंतपुरम,
Minor girl raped by sportsperson केरळ राज्य पुन्हा एकदा भयावह घटनेने हादरले आहे. एका अल्पवयीन दलित खेळाडू मुलीवर तब्बल ६४ जणांनी अमानुष अत्याचार केल्याचा थरकाप उडवणारा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संताप आणि धक्का व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील रहिवासी असून, ती खेळाडू आहे. तिच्यावर १३ वर्षांच्या वयापासून सतत अत्याचार होत असल्याचे तपासात समोर आले आहे. सुरुवातीला सहा आरोपींना अटक करण्यात आली होती, तर पोलिसांनी नंतर आणखी नऊ जणांना ताब्यात घेतल्याने आतापर्यंत एकूण १५ जण अटकेत आहेत.
 
Minor girl raped by sportsperson
 
पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की, मुलीवर तिच्या प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि वर्गमित्रांसह अनेकांनी वारंवार बलात्कार केला होता. पोलिसांना मुलीच्या डायरीत आणि तिच्या वडिलांच्या मोबाईल फोनमध्ये महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. या फोन रेकॉर्डच्या आधारे सुमारे ४० संशयितांची ओळख पटवण्यात आली असून, या प्रकरणात एकूण ६० हून अधिक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पथनमथिट्टा जिल्ह्यातील विविध ठाण्यांमध्ये पाच वेगवेगळ्या एफआयआर नोंदवल्या आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात "POCSO" कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतील कलमे लागू करण्यात आली आहेत. तपासाची सूत्रे सध्या पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाकडे आहेत.
 
बालकल्याण समितीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वर्तनात अचानक झालेल्या बदलांकडे तिच्या शिक्षकांचे लक्ष गेले आणि त्यांनी ही बाब समितीकडे मांडली. समुपदेशनादरम्यान मुलीने आपल्या वेदनादायक अनुभवांची माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सध्या पीडितेला मानसिक आधार मिळावा म्हणून तिला मानसशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे केरळमध्ये मोठी खळबळ माजली असून, समाजातील सर्व स्तरांतून कठोर कारवाईची मागणी होत आहे. मानवी संवेदनांना हादरा देणाऱ्या या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.