वर्धा, Niranjan died : आष्टी येथील बौद्धपुरा भागातील निरंजन विघ्ने याला नातेवाईक तिघांनी मारहाण केल्यानेच निरंजनचा मृत्यू झाल्याची धकादायक बाब ४ रोजी तक्रारीनंतर पुढे आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणार्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
वृद्ध निरंजन विघ्ने यांना २६ जुलै रोजी नातेवाईक असलेल्या प्रशांत, शिला व सारिका विघ्ने यांनी बेदम मारहाण केल्याने ३१ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण, ही बाब त्यांनी इतर कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. अन्त्यसंस्कारानंतरही हा प्रकार उघडा पडू नये यासाठी बनाव तिघांनीही केला. मध्यंतरी एक मारहाणीचा व्हिडीओ पुढे आला. तो मृताच्या अतिशय निकटवर्तीय नातेवाईकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर या प्रकरणावरील पडदा उठला. अखेर या प्रकरणी निरंजन विघ्ने यास मारहाण करून ठार केल्या प्रकरणी तक्रारीवरून प्रशांत, शिला व सारिका विघ्ने यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.