जालना,
Sambhajinagar young man commits suicide जालना जिल्ह्यातील ढोकमळ तांडा येथे सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि धमक्यांच्या मानसिक तणावाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणाचं नाव महेश आडे (वय 28) असं असून, तो काही दिवसांपूर्वी संभाजीनगर नामफलकाखाली लघुशंका करतानाच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला होता. घडले असं की, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील नावफलकाखाली दोन मित्रांनी लघुशंका केली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपून तो सोशल मीडियावर अपलोड केला.
काही वेळातच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओमुळे दोन्ही तरुणांवर नेटीझन्सकडून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. त्यांना सोशल मीडियावरून शिवीगाळ, धमक्या आणि अपमानास्पद संदेश येऊ लागले. त्यामुळे या दोघांनी लगेच माफी मागणारा एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करून सार्वजनिकरित्या क्षमायाचना केली. मात्र तरीही त्यांच्यावर होणारा ट्रोलिंगचा आणि धमक्यांचा मारा थांबला नाही.
सतत येणाऱ्या धमक्यांनी मानसिक तणावाखाली आलेल्या महेश आडे या तरुणानं अखेर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. "मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करणार आहे, असं त्यानं आपल्या मित्रांना सांगितल्यानंतर काही तासांतच त्यानं ढोकमळ तांड्यातील विहिरीत उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत, “व्हिडिओ व्हायरल करणारे आणि धमकी देणारे जबाबदार आहेत, अशी तक्रार दाखल केली आहे. सध्या आष्टी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.