शिक्षकाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परस्पर हडपली

पंचायत समितीकडून चौकशी सुरू

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
धारणी, 
students-scholarships : धारणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गोंडवाडी जि. प. पूर्व माध्यमिक शाळेतील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणीमार्फत देय असणार्‍या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर काढून आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या शिक्षकाविरुद्ध कारवाई झालेली नसल्याने शिक्षण क्षेत्रात असंतोष पसरलेला आहे.
 
 
amt
 
तालुक्यातील गोंडवाडी पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ८ वर्ग असून शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा प्रशासनाने प्रती वर्ष हजार रुपये आणि दिड हजार रुपये देय असलेले शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना न देता शाळा समितीच्या काही सदस्यांच्या संगनमताने हडपून घेतले. आदिवासी विकास विभागाद्वारे १ ते ४ वर्गातील आदिवासी विद्यार्थ्यांना एक हजार तर ५ ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पंधराशे रुपये वार्षिक प्रमाणे देण्यात येत असतात. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेतील हा पैसा सरळ विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता असते. मात्र, संबंधित शिक्षकाने शाळा समितीच्या सदस्यांना हाताशी घेऊन पैसे विद्यार्थ्यांना न देता परस्पर काढून गैरव्यवहार केल्याने एकच खळबळ उडालेली आहे.
 
 
माहितीप्रमाणे, संबंधित शिक्षकाने शाळेतील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि किचन साहित्य व इतर शैक्षणिक साहित्याची परस्पर व्हिलेवाट करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती आदिवासी पालकांनी दिलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांवर असलेल्या शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असते. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेमुळे शाळाबाह्य मुलांना व नियमित शिक्षण घेणार्‍यांना प्रोत्साहन मिळत असते. याशिवाय आदिवासी पालकांना सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण होऊन घरात शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. मात्र, धारणी पं. स. अंतर्गत गोंडवाडीसह काही ठळक शाळांमधून शिष्यवृत्तीची रक्कम हडपण्याचे कृत्य झालेले आहे. गोंडवाडी शाळा एक उदाहरण समजून इतर शाळांची तपासणी स्वतंत्र पथकाद्वारे करण्याची गरज आहे. गोंडवाडी शाळेचे केंद्र प्रमुख किंवा गट शिक्षणाधिकारी यांना वगळून इतरांद्वारे चौकशीची गरज आहे. 
 
चौकशी सुरू आहे 
 
 
धारणीच्या गटविकास अधिकार्‍यांना या विषयी विचारणा केली असता गोंडवाडी शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येऊन लवकरच अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळाले.