तभा वृत्तसेवा
दारव्हा,
vande-mataram-darvha : वंदे मातरम गीत गायनाला 7 नोव्हेंबरला 150 वे वर्षे पूर्ण होत आहे. या अनुषंगाने राज्याच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याव दिवशी वंदे मातरम् गीत सादर करण्याचा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. या दिवशी एकाचवेळी राज्यभरात ‘वंदे मातरम्’ गीत सादर होणार आहे. या विश्वविक्रमात सहभागी होण्यासाठी दारव्हा येथे तयारी सुरू झाली आहे. यात पाच हजार विद्यार्थी, तरुण जागरूक नागरिक सहभागी होणार आहे.
मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दारव्हा येथे सकाळी 9.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून गटविकास अधिकारी राजीव शिंदे, गटशिक्षणाधिकारी क्रांती खेडकर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद देशकर, सागर खेडकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.