नागपूर,
VNIT Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी ), नागपूर येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ‘४ थी आंतरराष्ट्रीय परिषद ऑन पॅराडाइम शिफ्ट्स इन कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टिम्स, मशीन लर्निंग अँड सिग्नल प्रोसेसिंग ( पीसीईएमएस २०२५)’ या दोन दिवसीय परिषदेचा प्रारंभ गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी झाला. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ. पी. हनुमंथा राव, महासंचालक, समीर (मेईट, भारत सरकार) यांनी “५जी आणि ६जी टेक्नॉलॉजीज : इंडिया इनिशिएटिव्ह्स” या विषयावर प्रमुख व्याख्यान दिले. त्यांनी भारतातील स्वदेशी मिमो आणि एमएमवेव्ह प्रणालींच्या प्रगतीबरोबरच ६जी संशोधनातील द्धिमान परावर्तक पृष्ठभाग व ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम सारख्या संकल्पनांवर प्रकाश टाकला.
यानंतर आयआयटी मद्रासचे प्रा. ए. एन. राजगोपालन यांनी “पाण्याखालील आणि ड्रोन-आधारित समुद्र-पृष्ठभाग प्रतिमांसाठी संगणक दृष्टी” या विषयावर व्याख्यान देत सागरी आणि हवाई प्रतिमांसाठी विकसित डीप लर्निंग मॉडेल्सचे अनुभव सांगितले. आयआयटी दिल्ली चे प्रा. सुमंत्र दत्ता रॉय यांनी “जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स” वर सोप्या भाषेत व्याख्यान देत आधुनिक एआय प्रणालीतील त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच आयआयटी कानपूरचे प्रा. राजेश एम. हेडगे यांनी “ब्लॉकचेन आणि फेडरेटेड लर्निंग” यांचे एकत्रीकरण ऊर्जा व विलंब नियंत्रणासाठी कसे उपयुक्त ठरते, हे सविस्तर सांगितले.
या परिषदेसाठी देश-विदेशातून २९६ संशोधन प्रबंध प्राप्त झाले असून, १२५ उत्कृष्ट प्रबंध सादरीकरणासाठी निवडले गेले आहेत. १६ विषयांवर आधारित तांत्रिक सत्रे तसेच उद्योग प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाला आयईईई महाराष्ट्र सेक्शन, स्पाराटसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, अँसिस, सायंटेक, मॅथवर्क्स आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. निवडक संशोधन लेख स्प्रिंगरच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मधील व्याख्यान नोट्स मालिकेत प्रकाशित होणार असून, तरुण संशोधकांसाठी हे व्यासपीठ जागतिक दर्जाचे संशोधन आदान प्रदानाचे केंद्र ठरणार आहे.