मुंबई,
Maid commits suicide in Mumbai मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात एका आलिशान सोसायटीत घडलेल्या घटनेने खळबळ उडवली आहे. 27 वर्षीय मोलकरणीने संशय आणि मानसिक तणावाच्या छायेत आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली असून, मृत महिलेचे नाव च्योईसंग तमांग असे आहे. ती मूळची दार्जिलिंग येथील रहिवासी होती आणि गेल्या दोन वर्षांपासून अँटॉप हिलमधील आशियाना सोसायटीत एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी मोलकरीण म्हणून कार्यरत होती.

मंगळवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास दाम्पत्याच्या घराच्या बाल्कनीत तमांग गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, तमांग ज्या घरात काम करत होती, तेथून सुमारे दहा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या चोरीच्या घटनेनंतर त्या दाम्पत्याने तिच्यावर संशय व्यक्त केला होता. या संशयामुळे तमांग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. याच दबावातून तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
अँटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, तमांगच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार किंवा गुन्हेगारी हेतू स्पष्ट झालेला नाही. मात्र, आत्महत्येमागचं खरं कारण आणि दागिन्यांच्या चोरीप्रकरणाचं सत्य शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, तमांग ज्या कुटुंबाकडे काम करत होती ते ७० वर्षीय वृद्ध दाम्पत्य असून, ती गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत होती. त्यामुळे तिच्यावर चोरीचा संशय घेण्यात आला होता का आणि त्यातूनच तिने आपलं जीवन संपवलं का, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून, आत्महत्येमागे नेमकं कारण काय आणि या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.