ढाका,
A wave of anger in the sports sector बांगलादेश महिला क्रिकेट विश्व पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय महिला संघाच्या माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जहांआरा आलम हिने संघातील माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. जहांआराने एका क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत या धक्कादायक घटना उघड केल्या. तिने सांगितले की मंजुरुल इस्लाम वारंवार तिच्याशी अयोग्य वर्तन करत असे, तिच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करत असे आणि अशोभनीय वैयक्तिक टिप्पणी करत असे. तिने सांगितले, “तो माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारायचा ‘तुझी मासिक पाळी किती दिवस टिकते?’ आणि नंतर म्हणायचा, ‘ती संपल्यावर मला भेटायला ये.’” या वक्तव्यामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

जहांआराने पुढे सांगितले की , मंजुरुल इस्लामने आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर प्रचलित प्रोटोकॉलकडेही दुर्लक्ष केले. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धांनंतर हस्तांदोलनाऐवजी तो मुद्दाम तिच्याकडे येऊन मिठी मारण्याचा प्रयत्न करत असे. हे सर्व प्रकार संघातील इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांसमोरच घडत असत, असा तिचा दावा आहे. जहांआरा आलमने सांगितले की तिने वारंवार बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) कडे या गैरवर्तनाची तक्रार केली, परंतु तिच्या तक्रारींकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्या वेळी महिला क्रिकेट विभागाचे प्रभारी नदीम हुसेन सिराज यांच्याकडेही तिने आपली व्यथा मांडली होती. मात्र, तक्रारी असूनही परिस्थितीत काहीही बदल झाला नाही, उलट छळ आणि भेदभाव वाढतच गेला.
जहांआराने पुढे सांगितले, मी अनेक वेळा अश्लील प्रस्तावांना सामोरे गेले. संघाशी निगडित असल्यामुळे अनेक गोष्टी उघडपणे सांगता येत नव्हत्या. २०११ मध्ये ‘तौहिद भाई’ नावाच्या व्यक्तीने ‘बाबू भाई’च्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. मी हे अनेक वेळा सांगितले आहे. मला माहित नाही, माझ्याशी इतका वाईट वागणूक का दिली गेली. मी खेळावर लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच दिवसापासून मंजू भाईंनी माझा अपमान सुरू केला. तिने आणखी एका घटनेचा उल्लेख करत सांगितले की, “जेव्हा मी सीईओंना पत्र दिलं, तेव्हा मी ते ‘तक्रार पत्र’ नसून ‘निरीक्षण पत्र’ म्हटलं होतं. त्यात मी घडलेल्या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला होता. मला सांगण्यात आलं की तौहिद सरांची काळजी घे, पण मी स्पष्टपणे सांगितलं ‘मी त्यांची काळजी का घ्यावी?’ मी हे सर्व सांगतेय कारण भविष्यात जर कोणत्याही मुलीला असा त्रास सहन करावा लागला, तर तिनेही धैर्याने लढा द्यावा. जहांआराच्या या धक्कादायक खुलाशांमुळे बांगलादेश महिला क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. चाहत्यांसह क्रीडा जगताकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.